९.५.१३

आयुष्य असं असतं...

कसं जगायचं, कसं जगायचं,
हे कुणालाच माहीत नसतं...
उमगणारं कोडं, उमगलेलं अगदी थोडं...
आयुष्य असं असतं...

जगतांना फक्त जगायचं असतं...
एकेक क्षण निसटतांना पहायचं असतं...
हसायचं, रडायचं, धडपडल्यावर पुन्हा उठून चालायचं असतं...
कळलेलं, कळलेलं, पण त्या वेळेशी सूर जुळलेलं...
आयुष्य असं असतं...

देत असतं की नेत असतं, काही केल्या कळत नसतं...
दोन क्षणांचं गणित कधीच जुळत नसतं...
साठवायचं की आठवायचं, हे ही ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं...
कधी मैफल रंगलेलं, कधी खूप मरगळलेलं...
आयुष्य असं असतं...

कसं जगायचं विचारतांना, जगणं विसरायचं नसतं...
प्रवास चुकला की काय, म्हणून वाटेतच उतरायचं नसतं...
गोंधळलेल्या क्षणी बावरलेलं, पण आपण होऊन सावरलेलं...
आयुष्य असं असतं...
 
आपणच घडवलेलं आयुष्य फक्त प्रश्न नसतं...
स्वतःत दडवलेलं, बाहेर शोधायला लावणारं उत्तर असतं...
प्रश्न एकच ठेवून , अनेक पर्याय देणारं,
आयुष्य असंच असतं...
आयुष्य असंच असतं...
-------------------------------------------------------------------------------------------
-हर्षल(२३/०३/२०१०-सायं ५.४०)
मायबोलीवर पूर्वप्रकाशीत 

२५.४.१३

पुन्हा हात हाती धरू एकदा...

पुन्हा हात हाती धरू एकदा,
'कुणी' जिंकण्यासी, हरू एकदा...

जरी वय न झाले, मनाचे तरी,
कसे छेडले तू, स्मरू एकदा...

तुझा उंबरा लांघला रे सख्या;
पुन्हा माप ते चल भरू एकदा...

कधी सोडला हात धुंदीमध्ये,
जरा दु:ख त्याचे करू एकदा...

जगत राहिलो एकमेकांमुळे,
अता त्याचसाठी मरू एकदा...
==========================
हर्षल (२५/४/२०१३ - दु. २.००)

२१.४.१३

थोडंसं मनातलं...

........................संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर, केवळ भुकेचे विचार डोक्यात घोळत राहतात. एरव्ही सुद्धा डोकं फार ताळ्यावर राहतं अशातला काही भाग नाही. पण त्या दिवशी ऑफिसमधल्या टेन्शनचा भार डोक्यावर घेऊन निघालो होतो. खूप असं नाही, पण होतं तेवढंच पुरेसं आणि नकोसं होतं.
........................येरवडा ते पुणे स्टेशनच्या पीएमटीमध्ये बसल्यानंतर, मी माझ्याच विचारांत गुंतलो होतो. आजुबाजूला फक्त गोंधळ ऐकू येत होता. मी ते सगळं ऐकून घेत होतो, त्यातही मनातले आवाज अजून डोकं बधीर करत होते. सेंट्रलला त्या बसमध्ये ती 'चौघं' बसली. अर्थात उभी राहिली; कारण 'आम्ही' जागा व्यापलेल्या होत्या. त्यांचं एकमेकांशी अगदी हसत-खेळत संभाषण चाललं होत. ते काय बोलतायेत याकडे कुणाचं किती लक्ष होतं मलाही ठाऊक नाही. कारण प्रत्येकजण माझ्यासारखाच कुठल्या न कुठल्या विचारांत, कुणाशी बोलण्यांत मग्न होता. बस ट्रॅफीकमधून वाट काढत जात होती.
........................पण तेवढ्या वेळात हळुहळू सार्‍यांचं लक्ष त्या चौघांच्या बोलण्याकडे जायला लागलं. कुणाचं कौतुकाने, कुणी थट्टेने त्यांच्याकडे पहायला लागले. ती चौघं त्यांच्याच जगात हरवलेली होती. एकमेकांशी हातवारे करुन बोलणारी ती अगदी मनमोकळेपणानं; बसमधल्या गर्दीत आपण उभे आहोत याची पर्वा न करता अगदी सहज एकमेकांशी संवाद साधत होती.
........................ माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं, ते ही लोकं नक्की का अशी हातवारे करून बोलताय; आणि संपूर्ण बसमधल्या गोंधळाचा; गर्दीचा त्यांना काहीच कसा फरक पडत नाहीए या विचारामुळे. ती बोलत होती, पण तिथे शब्द नव्हते; हसत होती पण त्या हसण्याला आवाज नव्हता. खिडकीबाहेर धो-धो पाऊस पडावा; पण आपल्याला त्याचा आवाजही येऊ नये; पडणारी प्रत्येक सर आपल्याला ये-ये म्हणुन बोलावतेय आणि तरीही जाता येऊ नये, अशा त्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद ती चौघंच घेऊ शकत होती. त्यावेळी माझ्या मनात एक निर्वात पोकळी तयार झाल्यासारखी मला वाटलं. माझ्या डोक्यातले विचार तोपर्यंत कुठेतरी लांब निघून गेले होते.
........................ आणि मी फक्त त्यांच्या चेहेर्‍यावरच्या निर्मळ आनंदाकडे पाहत होतो. अगदी थोडाच वेळ; मी बसमधून उतरेपर्यंतच मला तो आनंदाचा पाऊस अनुभवता आला. पण त्यात भिजून मला अगदी मोकळं झाल्यासारखं वाटलं. शब्द बोलता येतात; ऐकू येतात; पण त्यांना आजूबाजूच्या समान लोकांसमोर व्यक्त करतांना दहा वेळा अगम्य दुनियेच्या रीती-रिवाजांचा विचार करणारे आपण. आणि एक शब्दही न बोलता हवा तो अर्थ; हवी ती भावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य असलेली ती चौघं मला माझ्यापेक्षाही कितीतरी भाग्यवान वाटली. ती एकमेकांच्या हृदयाची भाषा बोलत होती असं मला वाटलं.
........................ आणि मला मात्र माझ्या मनातल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी किती शब्द वेचावे लागतात?
 

१७.४.१३

काळ आहे लोटला...

जाहली पोटामध्ये गलबल इथे,
चालला आहे कशाचा खल इथे?

थेंब पाण्याचा मिळेना दूरवर,
वाहतो डोळ्यांतुनी बादल इथे...

हुकुमशाहीचा म्हणे धिक्कार अन्,
वागणे यांचे जसे मोघल इथे...

माजले नेतेच दरवेशापरी,
नाचते जनता जसे अस्वल इथे...

सोड कागाळ्या जगाच्या बैस रे,
मागवू आपण चहा स्पेशल इथे...

काळ आहे लोटला, विसरून जा,
दु:खही भासे नवे 'हर्षल' इथे...
--------------------------------------
हर्षल (१७/४/२०१३ - दु. ३.३०)

१५.४.१३

दोन मी...


जरी खुले आकाश मला,
कळे न; जावे कुण्या दिशेला,
गुंतत जातो स्वतःत मग मी,
शोधत बसतो स्वतःस मग मी...

देत जगाला तोंड एक तो,
दुसरा शोधे जगी कोण मी?
कुणास नाही ठाऊक माझे,
माझ्यामधले असे दोन मी...
-----------------------------------------
हर्षल (१४/४/१३ - सायं. ७.४५)

४.४.१३

वसंता तुझ्या येण्याने...

वसंता तुझ्या येण्याने, फार न काही बदलले,
पक्षी मुक्त जाहले आणि वृक्ष जरी अन् मोहरले...

रूक्ष उन्हाचा असह्य चटका, काहिली करे अंगांची,
जाळून आलो दुर्गुण, केली उधळण जरी अन् रंगांची...

वणवण करिती बांधव माझे, दोन घोट पाण्यासाठी,
लाख घोषणा कुणी करो, म्हणो देश जरी अन् त्यांपाठी...

अता न सुचती कविता मजला, आईच तेव्हा आठवते,
डोळ्यांमधले पाणी सुद्धा, पळीत जरी अन् साठवते...

..........................................................

वसंता तुला एक मागणे, नियम मोडून देशील का?
आगमनाच्या आनंदाला, पाऊस घेऊन येशील का?
--------------------------------------------
हर्षल (४/४/२०१३ - दु. १.००)

२६.३.१३

मेरी उडान...

फिर वही बाते, फिर वही चेहेरे,
वही याँदे, वही सारे,
बीते दिनकी बात निकाले,
लेकर आते रोती शक्ले,
नया कुछ करते नही,
जिंदगीमें रंग भरते नही,
और गुजरे पिछली गलियोंसे,
अपनें छुटे निशाँन ढुंढते...

क्यूँ ना होता पाना खुदको इतनाभी आसान?
सीख ज्यों होती हरेक मोड की कभी ना एकसमान...

दिन के बाद आए रात, रोज नया सवेरा,
एक डाल पर पँछीभी ना रोज करे बसेरा...
जिस दिन बाँधे पंख खुदहीने,
छोड दी बीच उडान,
लाख मिलेंगे बुझे सितारे,
पडे कही सुनसान...

करो नजारा खुली आँखसे,
दुनिया देखो नयी सोचसे,
बदला जाता रोज किनारा,
तैर ना पाता कभी जो हारा,
या तो ढूँढो सागर न्यारा,
मन में रखलो कोई तारा,
मँजीलतक ना पहूँचो जबतक,
रुकने ना दो खुदको तबतक...
अपने मन में ले लो ठान,
रोक सके ना मुझको कोई,
और ना मेरी उडान...
और ना मेरी उडान...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२६/३/२०१३ - ११.४५  PM)

२५.३.१३

नसतेस ऑनलाईन तू...


नसतेस ऑनलाईन तू, इंट्रेस्टच निघून जातो,
तुजवीण कुणी आवडेना, पण ऑप्शन पाहून घेतो...

येतो मी फेसबूकवरती, बोलण्या तुझ्याशी काही,
असतेस ऑफलाईन तू, मज काही समजत नाही,
मग दोनदोनदा तुझ्या त्या, प्रोफाईलवरती जातो,
अन् प्रोफाईलच्या पिकला, मी तासन् तास पहातो...

दिसतात तुझ्या अपडेट, कोपर्‍यात उजव्या जेव्हा,
आहेस ऑनलाईन तू, हे कळते मजला तेव्हा,
पण चॅटींगसाठी तुजला का भाव गडे लागतो?
क्षणभर बोलायासाठी, मी रात्रभर जागतो...

तू तरीही बोलत नाही, काहीही सांगत नाही,
वाटे जरी "खूपच झाले", तरी वाट बघत मी राही...
या फेसबूकाचासुद्धा, आता कंटाळा येतो,
काहीही मिळकत नाही, पण त्रास फुकाचा होतो...

एवढे करूनही जेव्हा, मज तुझी आठवण येते,
ना राहवून ती मजला, मग येथे घेऊन येते,
नवनवीन पाखरांचा, मज पत्ता मिळूनी  जातो,
क्षणभर का होईना मी, अन् तुलाच विसरून जातो...
--------------------------------------------------------------------
हर्षल (२५/३/२०१३ - रात्रौ. ११.२०)

२२.२.१३

जमेल का तुला...

निघायचे असेल ना? जपून जा,
घरात काय राहिले, बघून जा...

सुने तुझ्याविना असेल देवघर,
(सुगंधरूप त्यात तू भरून जा...)

छतास उंच राहिले करायचे,
इथून तू हळूच अन् लवून जा...

सुके
बाग ही तुझ्या विना, जरा;
फुलांस स्पर्श एकदा करून जा...

जमेल का तुला फिरून पाहणे?
जमेल त्याक्षणी पुन्हा वळून जा...

पुरे मनात आसवांस ढाळणे,
इथेच यायचेय ना?, हसून जा...
----------------------------------------------------------------
हर्षल (२२/२/१३ - सकाळी १०.३५)

१६.२.१३

नि:शब्द प्रेम माझे...

पैशात फार थोड्या भागेल एक दिवशी,
प्रेमात सर्व आहे, समजेल एक दिवशी...

दु:खास अंत नाही, समजून वाग ना तू,
सुख भोगण्याची तर्‍हा, बदलेल एक दिवशी...

सांभाळ तू घराला, अंधार मी पहातो,
समई उजेड देती, गवसेल एक दिवशी...

नि:शब्द प्रेम माझे, सांगू कसे तुला मी?
विसरावयास दैन्य, विनवेल एक दिवशी...

आहे जरी कफल्लक, दिलदारही मी आहे,
जागा तुझ्या मनी मी मिळवेल एक दिवशी...

आभाळ फाटलेले, दे हात तू जरासा,
लढतोय एकट्याने, उसवेल एक दिवशी...
---------------------------------------------------------------
हर्षल (१६/२/१३ - रात्रौ. १०.३५)
---------------------------------------------------------------