१४.४.१५

कॉफी आणि बरंच काही...

...................प्रेम करूनही व्यक्त न होता येणं, आणि त्यामुळे कित्येक अधुर्‍या कहाण्या सुफळ संपूर्ण न होणं, हे आज कालच्या फास्ट फॉर्वर्ड जमान्यात शक्य तरी आहे का, असा प्रश्न मनात येणार्‍या लोकांसाठी कॉफी... हा चित्रपट नाही. चित्रपट त्या लोकांसाठी आहे, ज्यांना जगासमोर इतर कोणत्याही गोष्टीवर खूप बोलता येतं, व्यक्त होता येतं; पण प्रेम हा विषय आला, की मग मात्र दातखिळी बसते. आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांंमध्ये फिट बसतो का? आपल्यामध्ये समोरच्या व्यक्तीला किती इंटरेस्ट आहे? आपण आपलं प्रेम व्यक्त केल्यानंतर आपल्याला होकार मिळेल का? आणि नकार मिळाला तर आपण तो सहन करू शकू का? या प्रश्नांनी नाही म्हटलं तरी पुढे जाण्याचं धाडस मुलांमध्ये यायला, अजून किती अवकाश जायचाय देव जाणे. आणि मला तो आवडत असला, तरी प्रपोज त्यानेच करायला हवं. त्याला मी आवडते हे त्याने सार्‍या जगासमोर किमान हळू आवाजात तरी बोलायलाच हवं ह्या कल्पनांपासून मुली कधी दूर जाणारेत हे ही देवच जाणे... परंतू या सगळ्यांत आपल्याला आवडणारी व्यक्ती नकळत हरवून जाते, प्रेम व्यक्त न केल्याने आपण आयुष्यातली एक महत्वाची स्टोरी खरोखर अर्धवट सोडून देतो. कारणं काहीही असोत, परिणाम मात्र वाईटच. कॉफी... या सगळ्यांवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणून किमान एक तरी प्रेमकहाणी पूर्ण करतो. अगदी साध्या सोप्या विषयाभोवती छोट्या छोट्या प्रसंगातून परिणाम साधत कॉफी आणि बरंच काही हॅपी एंडिंगला येतो.
...................चित्रपट कुणाचा, कोण कोण लीड अ‍ॅक्टर्स, अ‍ॅक्ट्रेस, सपोर्टिंग कास्ट आहे हे ऑलरेडी चित्रपट प्रदर्शित होऊन आठवड्याहून आधिक काळ होऊन गेल्यामुळे लिहित बसत नाही. इथे मुलगा आणि मुलगी दोघंही एकमेकांना पसंत करूनही केवळ संवाद न साधण्यामुळे, ऐन वेळी मनात आलेल्या भावनांना योग्य त्या शब्दांत व्यक्त न केल्यामुळे, एकमेकांपासून दुरावण्यापर्यंत येतात. त्यांना समजावून सांगायला मित्र, मैत्रिणी, आई-बाबा, लहान-मोठे भाऊ बहिणी इतके सगळे समजूतदार लोक सोबत असतात. तरीही, पाऊल पुढे टाकयचं कुणी, या एका प्रश्नापुढे दोघेही हतबल होऊन केवळ होतंय त्याकडे पाहत राहतात, ही आजुबाजूलाच घडणारी गोष्ट दिग्दर्शकाने गुंफलीये.
...................आपली जनरेशन, प्रेमात पडली तर एकाच्याच पडेल अशीही आहे, आणि "आज पूजा, तो कल कोई दूजा" अशीही आहे. ती स्वपसंतीनेच लग्न करण्याच्या फेवर मध्ये आणि कांदेपोहे च्या अपोजमध्ये आहे. तसंच कांदेपोहे सुद्धा चवीने चाखून, चहा कॉफी घेता घेता, नीट सर्व बाबी तपासून, मनमोकळं बोलून मग काय हवं नको त्यावर निर्णय घेणारी सुद्धा आहे. वय वाढत जातंय म्हणून, आई-बाबांना काळजी वाटतेय म्हणून, शेजारी पाजारी नावं ठेवतात म्हणून, मित्रांची लग्न होतायेत म्हणून आणि केवळ आयुष्यात कुणीतरी सोबत हवीय म्हणून लग्नाला तयार व्हायचं हे आम्हाला पटत नाही, आणि त्याला उघड विरोध केला तरी, एका मर्यादेपलीकडे हात गुडघे टेकवण्या आणि मान टाकण्याशिवाय ऑप्शन उरत नाही. कॉफी हा सध्याचा कांदेपोह्यांना (सुशिक्षीत+अर्बन) समर्थ ऑप्शन आहे. पण तरीही, शंकांचं मोहोळ काही केल्या थांबत नाही, आणि निर्णय घेणं सोपं पण होत नाही.
...................ह्या चित्रपटात एक गोष्ट अधोरेखीत होते ती ही, की प्रेम करण्यासाठी व्यक्ती तुमच्या आजुबाजूची असते. म्हणजे, तुम्ही जिथे सोशलाईझ होत असतात, जिथे तुमच्या ओळखी होत असतात अशा ठिकाणी तुम्ही एखाद्या व्यक्तीला लाईक करतात. आणि मग तिथून पुढे गोष्टी आधी प्रोफेशनल आणि मग पर्सनल लेव्हल वर बदलत जातात. इथे कॉलेजमधलं प्रेम हा विषय नाही. लग्नाळू मुलं - मुली अशाच जागांमधून एकमेकांसाठी लाईफ पार्टनर शोधतात. त्यामुळे इमोशनल कोशंट सुद्धा आपल्या जनरेशनचा तितकाच हाय(high) हवा हे ही तितकंच महत्त्वाचं. गोष्टी सकारात्मक शेवटास जातील याचाही कुठलाच भरवसा नाही. त्यामुळे, कॉफीचा आनंद घेत घेत आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची आजकालची पद्धत जितकी सुखदायक आहे, तितकीच त्रासदायक सुद्धा होते, पण तो या चित्रपटाचा भाग नाही.
...................पार्श्वसंगीत उत्तम. व्हायोलिन्सचा मस्त, सुरेल आणि सुरेख उपयोग. तसंच, सिचुएशन ला साजेशा याद पियाकी आये... असा शास्त्रीय संगीताचा वापरही मस्त. छोट्या छोट्या शेरांची पेरणी मस्त. बॅकग्राऊंडला चालणारं एक गाणं, एक आणखी साँग आणि चित्रपटाचा योग्य जागी, योग्य ठिकाणी होणारा योग्य शेवट. इन शॉर्ट, जगण्याचा एक साधा सोपा अनुभव, नेटक्या चौकटीत मांडलेला एक मस्त चित्रपट. कॉफी आणि बरंच काही... किंवा, बरंच काही आणि कॉफी (असं नवीन बदललेलं नाव).
Harshal (14/04/2015 - 00:25 Tuesday)

१६.२.१५

एक संध्याकाळ...

................उन्हाळा सुरू झाल्याची मला चाहूल लागते ती अशी. एखाद्या संध्याकाळी, खूप कामं करायची असतांनादेखील अजिबात उत्साह जाणवत नाही. मन अगदीच रिकामं असतं. म्हणजे काहीतरी हरवलंय असं अचानक वाटायला लागतं, पण काय ते नेमकं शब्दांत सुचत नाही. गेल्या काही दिवसांतल्या सर्व घटनांचा मनात आढावा चाललेला असतो, तरीही त्यातून नेमकं काय हवंय ते कळत नाही. नुसताच वेळ घालवायचा असतो, पण तो जाता जात नाही.

................कुणीतरी सोबत असावं असं वाटत असतं, पण ती व्यक्ती जवळ असत नाही. अचानक कोसो दूर गेल्यासारखी भासते. फोन उचलावा, नंबर शोधावा, पण डायल करावासा वाटत नाही. म्हणजे त्या फोनकडे बघतांना, त्यालाच आठवण येऊन त्याने फोन केला तर... असं म्हणत फोनकडे नुसतं पहात रहायचं. बाहेर उगाच चालायला जावं, पण कुठे ते कळत नाही. वारा सुटत नाही, आणि फार गरमही होत नाही.

................आपण हे सगळं का करतोय, हा प्रश्न स्वत:ला दहावेळा विचारला, तरी कुणीच उत्तर देत नाही. एखाद्या नदीच्या किनारी जाऊन, केवळ शांत बसावं. तिथे अवखळ प्रवाहाचा आवाज आपल्या मनातल्या खळबळीशी जुळावा. अचानक एखादी थंड वार्‍याची झु़ळूक यावी, आणि मारव्याचा 'त्या' कोमल ऋषभाची कुणीतरी आपल्याला कातरतेने साद घालावी असं वाटत असतं. पण तसं काहीच होत नाही. एकटेपण जात नाही. मग परत फिरून घराकडे निघावं. वाटेतल्या येणार्‍या जाणार्‍या गर्दीला न्याहाळावं. आणि पुन्हा असं काही झालं तर काय करायचं याचा विचार करत घरी येतो. पण तरीही उत्तर असं मिळत नाही... दरवर्षी मला उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागते ती अशी...
- हर्षल (१६/०२/१५ - रा. १०. ०० )

१९.९.१४

तुझे देणे...

तुझ्यासारखे सहज देणे जमले असते तर,
दाता होणे आवडले असते,
तुझ्यासारखे हसून घेणे जमले असते तर,
याचक होणे आवडले असते...
देण्या-घेण्यामधली भावना; इतरांचे सुख पाहणे,
कळले असते तर,
तुझ्यासारखे सुखी राहणे जमले असते...
देता आलं नाही, घेता आलं नाही,
हिशोब ठेवत गेलो केवळ,
जगता आलं नाही...

पण त्या हिशोबांच्या चोपडीमध्ये, तू प्रेमानं दिलेलं मोरपीस तेवढं
सुख म्हणून जपून ठेवलंय,
त्या एका देण्यातून कधी मुक्त होता आलं नाही...
- हर्षल (१३/०२/१४ - रा. ११.२०)

२६.७.१४

निरोप

निरोप देणे, निरोप घेणे अवघड जागचे दुखणे आहे...

काही निरोप, "पुन्हा लवकरच भेटू", म्हणून हसत दिले जातात!
तर काही निरोप, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी, अश्रूंसोबत द्यावे लागतात...

खरा प्रश्न तर पुढे आहे,
जेव्हा पुन्हा कधी भेटू याची, आणि भेटलो तरी; आज जसे आहोत
तसेच राहील, याची शाश्वती नसेल...
ओळख काही क्षणांची असेल किंवा नातं अगदी जुनं असेल,
पण निरोप हसून द्यावा की अश्रू रोखून द्यावा?

ह्या प्रश्नांना निरोप देणे जमेल तेव्हा जमेल,
तुर्तास केवळ आहे हे असं आहे, मानून चालावे...
निरोप देणे, निरोप घेणे जीवनाचे अटळ मागणे आहे...

-Harshal (26/07/14 - 12.45 PM)

२४.२.१४

काही क्षण असायचे...

काही क्षण असायचे,
माझे मोजके बोलायचे,
मग यायची नि:शब्दता,
अन् स्वतःला सावरायचे...

आतल्या आत झुरणारे,
क्षण सर सर सरणारे,
श्वास खोल खोल जाणारे,
पाय जड जड होणारे...

भोवती जगरहाटी तशीच,
अव्याहत चालणारी,
आणि आतली खळबळ तिथेच,
भोवर्‍यासारखी घुमणारी...

तुझ्या साथीने कधी सुसह्य झालेली,
तुझ्या सोबतही अगदी असह्य वाटलेली,
ही वाट मला आजही खूप भावलेली,
जिथे आशेची ज्योत अजुनही तेवलेली...

आता विसर होतो आहे,
गोंधळल्या त्या क्षणांचा,
तुझ्या मुक्या ओठांवरच्या,
काही अबोल पणांचा...

जिथे मंदावली वाट,
तिथे घट्ट झाले हात,
शब्द मोकळे जाहले,
आले नेटक्या ओघात...

बाकी सारे लख्ख होते,
दोन क्षण स्तब्ध होते,
त्या क्षणांनी बदलले,
माझे प्रारब्ध होते...

आता ह्याच आठवणी,
तुझ्या माझ्या एक मनी,
आली सांज मोहरूनी,
भर प्रेमाची करूनी...

असे काय तेव्हा होते,
ज्याने रोखलेले होते,
तुला आधीच मिळाले,
मला कळले न होते?

पण तेव्हा काही क्षण असायचे,
तुझे मोजके हसायचे,
मग यायची प्रसन्नता,
सारे हलके हलके व्हावयाचे...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हर्षल (१०/१२/११-दु. ४.१५)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

१५.२.१४

मैत्रीमधले यात्री आपण...

आपण दोघे प्रवासातले, थोडे थोडे अंतर,
चालत जाता उगाच वाटे, झाले जंतर मंतर...
संपून जाते वाटच आणि संपत नाहीत गप्पा,
मैत्रीमधला जपलेला हा आयुष्याचा कप्पा...

उमटत जाते हृदयामध्ये प्रेमाची लकेर,
थोपवण्याचा हट्ट नाचतो मनात मांडून फेर,
हातामधल्या हातांना मग स्पर्शांचे उलगडणे,
अर्थांना, नात्यांना देता नावे; का अवघडणे?

क्षणिक मोहही चुकवून ठोका हॄदयाचा जातो,
वादळात सावरणारा मग हात मैत्रीचा होतो...
प्रेमाचे पण नाते होते, नात्यांचा होतो गुंता,
मैत्रीला पण भासत नाही, कधीच असली चिंता...

आपण दोघे मैत्रीमधले यात्री आनंदाचे,
सोबत चालत जाणे, जगणे अनंत क्षण सुखाचे...
कधी न संपो वाट आपली, थांबाव्या ना गप्पा,
मैत्रीमधला जपलेला हा आयुष्याचा कप्पा...
-हर्षल (१५/०२/१४ - दु. २.१५)

२२.१.१४

माझं फेसबूक पेज...

मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

सहज कधी आठवण येते त्या मित्रांची जे आता या जगात नाहीत,
पण तरीही त्यांना फ्रेंडलिस्टमधून उडवता येत नाही,
"मला विसरलास यार तू" म्हणून, जणू रागे भरतील, असतील तिथे...
त्यांच्या पेजवर स्पष्टपणे दिसते त्यांच्या असण्या-नसण्यातली रेषा,
त्यांची शेवटची पोस्ट आणि त्यावरती जगाने घातलेला RIP :'( च्या पोस्टचा रतीब...
ते गेल्यानंतरही, केवळ फेसबूक सांगतं या दिवशी ते जन्मले होते,
म्हणून हॅपी बर्थडे विशेस...
आणि क्षणभर वाटतं, काय खरं समजावं?
या शुभेच्छा की तो मित्र गेल्याचं दु:ख?
कालांतराने ते ही आठवणीतून निघून गेलेलं...
त्याला स्वतःला कधी तरी येऊन ते पेज पाहता येईल का?
आणि एखाद्या तरी पोस्टला उत्तर देता येईल का?

जगतांना; प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्यासाठी असलेल्या फेसबूकच्या भिंतीवर,
मेल्यानंतर, एकदाच... फक्त एकदाच, येऊन सारं साफ करून,
कुणाला तरी सांगायचे राहिलेले दोन प्रेमाचे शब्द लिहून जाता येणार असेल तर...

तसं होणार नाही म्हणून,
मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

- हर्षल (२२/०१/२०१४ - रा. ११.००)

२९.१२.१३

अपूर्ण कविता...

काल आणि परवा, दोन जुन्या मैत्रिणी भेटल्या,
एकीने हळवं होत, डोळ्यांत पाहत विचारलं, "अजुनही कविता करतोस का रे?"
दुसरीने शुन्यात पाहत, कोरडेपणानं विचारलं, "अजुनही कविताच करतोस का रे?"
आणि मी स्वतःत डोकावून पाहिलं,
आठवणींच्या खोल तळाशी जाऊन, अपूर्ण राहिलेल्या दोन्ही कवितांना कवटाळलं...

एक लिहून खोडलेली,
दुसरी चिडून फाडलेली...
त्यानंतर मला आठवत नाही; एकही कविता सुचलेली,
कुणासाठी लिहिलेली, कुणापर्यंत पोचलेली...
-हर्षल (२३/१२/१३ - रा. १०.४०)

१९.१०.१३

"संहिता" - चित्रपट परीचय

.....................मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या "संहिता-द स्क्रीप्ट" या चित्रपटाच्या प्रिमियरला चिन्मय दामले (चिनुक्स)मुळे जाण्याची संधी मिळाली. प्रत्यक्षात सारे कलाकार पाहण्यास मिळाल्यामुळे आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यात आल्यामुळे खूप मजा आली.

देविका दफ्तरदारसोबत :
प्रकाशचित्र सौजन्य : नचिकेत जोशी
मिलिंद सोमणसोबत :
प्रकाशचित्र सौजन्य : हर्षद पेंडसे

चित्रपटाविषयी :
...................'हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ' असं जेव्हा आपण सगळे म्हणतो, त्यामध्ये बर्‍याचदा पूर्वी घडून गेलेल्या घटनांशी बरचसं साम्य असलेल्या घटनांना आपण अनुभवत असतो. मग त्या घटना आपल्याच आयुष्याशी निगडीत असो किंवा दुसर्‍या कुणाच्याही... घटना घडत असतात, त्यांची आठवण ठेवली जाते, त्यांच्या कथा-दंतकथा होतात... आणि कालांतराने त्यावर, कुणाला अगदी काही खास वाटलंच, तर चित्रपटही निघतात...
...................आता चित्रपट म्हटला की पटकथा पहिले हवी. त्या पटकथेचा उगम (शिरीन आणि तिचा पॅरॅलाईझ्ड नवरा), त्या मागचा प्रेरणास्त्रोत (तारा देऊस्कर), त्या पटकथेचा प्रवाह (हेमांगिनी) आणि त्या पटकथेचा आत्मा (रेवती) आणि या सर्वांमार्फत ती पटकथा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे "संहिता- द स्क्रीप्ट". अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेल्या या चित्रपटाने दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं पटकावली आहेत. त्यामुळे मुळात या चित्रपटाची संकल्पना आणि त्याचं मूर्त रूप हे पडद्यावर दिसणार्‍या गोष्टींपेक्षा, ऐकू येणार्‍या संवादांपेक्षा आपल्या अंतर्मनात होणार्‍या उलथापालथीचं, आणि त्यातून आपल्याला होणार्‍या स्वतःबद्दलच्या साक्षात्काराशी खूप जास्त निगडीत आहे.
...................एक उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण स्त्री असणार्‍या; माहितीपट दिग्दर्शिका रेवती (देविका दफ्तरदार)ला, पक्षाघात होण्यापूर्वी नावाजलेला निर्माता असलेल्या माणसाची; त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्याची शेवटपर्यंत सेवा करणारी पत्नी शिरीन (ज्योती सुभाष) भेटायला बोलावते. आपल्या पतीची शेवटची इच्छा असलेल्या, १९६० च्या दशकात प्रकाशित झालेल्या एका लेखिकेच्या "दर्पण" या कथेवर चित्रपट बनवायलाच हवा म्हणून शिरीन, रेवतीला सांगते. त्यानुसार रेवती, त्या कथेची लेखिका तारा देऊस्कर (उत्तरा बावकर) यांना भेटते. त्या तिला कथा ऐकवतात. आणि त्यानुसार चित्रपटाची संहिता लिहितांना रेवती, हेमांगिनी (राजेश्वरी सचदेव) हिलाही भेटते, कथा ऐकवते. ह्या प्रवासात "दर्पण" कथा प्रत्यक्षात पडद्यावर कशी दिसेल ह्याचा रेवतीचा कल्पनाविलास आपल्यासमोर घेऊन येतो, 'संहिताचा' एक समांतर प्रवास... भव्य राजवाडा, शाही थाट, मैफिल, पोशाख, खानसामा, अदब, जरब, जुना पण हवासा वाटणारा काळ... इतकी सहज गुंफण ह्या चित्रपटात दाखवलीये की, मुळात संहिता कुठली, आणि वास्तव कुठलं याचा फरक सापडेनासा होतो... आणि हेच या चित्रपटाचं खरं यश आहे!!! स्मित
...................'दर्पण' कथा हेरवाडच्या संस्थानाचे राजे असलेल्या सत्यशील जहागिरदारांची (मिलिंद सोमण). त्यांच्या उच्चशिक्षित, स्वतंत्र विचारांची पत्नी असलेल्या मालविकाबाईंची (देविका दफ्तरदार). वडीलांनी बळजबरी, लहानपणीच लावून दिलेल्या लग्नामुळे असलेल्या असंतोषाची, आणि एकदा घडून गेलेल्या गोष्टीची जबाबदारी घेऊन, ती निभावण्याचा समजूतदारपणा न दाखवण्याची. आपल्या स्वतंत्र वृत्तीला मोडता न घालण्याची, आणि समर्पित न होण्याची. मग अशा वेळी राजवाड्यात येणार्‍या, दैवी गळा लाभलेल्या गायिका भैरवीच्या (राजेश्वरी सचदेव) प्रेमात पडून, राजधर्म विसरणार्‍या राजाच्या हातून चूक घडणे ओघाने आलंच. मग त्यांचा विरह, पुन्हा एकत्र येणं. त्या एकत्र येण्याला एक नवं नातं जोडलं गेलेलं असणं. ज्या नात्याचं प्रतिबिंब संपूर्ण जगाला अगदी स्पष्ट दिसत असतं, पण स्वत:चंच रूप त्यात पाहण्याची वाटणारी लाज खरी की स्वधर्माशी केलेली प्रतारणा आणि त्याबद्दल वाटणारी अपराधी भावना खरी... दुसरीकडे, आपल्या आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी आनंद देणंही तितकंच आवश्यक आहे याचा विसर पडलेली मालविका... सत्यशील राजाच्या आयुष्यात परतलेला तो आनंद, आणि त्याचवेळी त्याच्या प्रतिबिंबात दिसणारं त्याचं दु:ख, त्या दु:खामागचा आपला उदासीनपणा, आणि त्यापायी मुकलेल्या आपल्याच आनंदाची न होणारी भरपाई या सगळ्यांत काहीतरी सुटून गेलं नक्की असं वाटून पुढे काय, हा प्रश्न पडलेली... भैरवी इथे गायनासाठी आहे, आणि राजाला प्रेम देण्यासाठी... जीव ओतून गाणं आणि मनापासून प्रेम करणं... तर ते प्रतिबिंब हाच या तिघांना आपली स्वतःची ओळख करून देणारा "दर्पण"..
...................बदललेल्या काळासोबत मात्र, प्रश्न काही बदलत नाही. रेवतीचं आयुष्य अगदी मालविकासारखंच... स्वतंत्र, उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण त्यामुळे मुंबईत एकटं राहणं. तिचा नवरा रणवीर फ्लॉरीकल्चरीस्ट आहे. वडिलोपार्जित जमिनीवर फुलं उगवून ती एक्स्पोर्ट करण्याचा त्याचा व्यवसाय. त्यामुळे गावाकडे राहणं, वडीलांसोबत. दोघांचं लव्ह मॅरेज. मुलगी हॉस्टेलवर. नात्यांतली गुंतागुंत, आणि त्यामुळे घटस्फोटापर्यंत आलेली गोष्ट. शिरीनचं एक उपकथानक आहे. तीचं एक वेगळंच दु:खंय... पण 'संहिते'तल्या समर्पित प्रेमाचं उदाहरण ती स्वतः आहे. हेमांगिनीचं उपकथानक आहे. आणि ती 'संहिते'तल्या शोषणाचं उदाहरण आहे. तर तारा देऊस्कर ह्या 'संहिते'च्या "...अ‍ॅण्ड दे लिव्हड् हॅपिली एव्हर आफ्टर'चं उदाहरण आहे. समांतर संहिता आणि त्याचं आजच्या काळाशी असलेलं साम्य यामुळेच मी सुरुवातीला 'हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ' असं म्हटलंय. मात्र, इतिहासातून शिकण्यासारखी एकच गोष्ट असते ती म्हणजे, बदलती मानसिकता. बदलता काळ आपल्याला प्रगल्भ बनवत असतो. आणि जेव्हा हिस्टरी रिपीट होत असते, तेव्हा आपण पूर्वीपेक्षा खूप प्रगल्भ झालेलो असतो. ज्यामुळे ज्या गोष्टीचा शेवट पूर्वी दु:खद झालेला असतो, त्या गोष्टीचा शेवट सुखद कसा करायचा हे आपल्याला कळलेलं असतं. जर तसं नसेल, तर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' असं म्हणण्यावाचून पर्याय नसतो. तोपर्यंत त्याची संहिता आपली आपल्यालाच लिहावी लागते.
...................ह्या चित्रपटाचे खूप पैलू आहेत. संवाद ही सर्वांत महत्त्वाची बाजू. बर्‍याच दृश्यांमधली ओळन् ओळ विचार करायला लावणारी. त्यानंतर गाणी, आरती अंकलीकर-टीकेकरांचा आवाज, संगीत सगळं उत्तमच! चित्रीकरण, सेट, पोशाख... बोलावं तितकं कमीच... अभिनय सर्वांचा अगदी सहज-सुंदर. देविका दफ्तरदार दोन्ही भुमिकेंमध्ये खासच... मालविका म्हणून तर मला खूपच भावलीये ती... मिलिंद सोमण आणि राजेश्वरी सुद्धा उत्तम! उत्तरा आणि ज्योतीजी तर लीलया वावरल्यात... ह्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणार्‍या सुमित्रा भावे आणि गीतकार सुनिल सुकथनकर यांना सलाम! ही कलाकृती नक्कीच अविस्मरणीय झालीय...
...................एकंदर हा चित्रपट 'क्लास' साठी आहे. 'गॉड इज अ बॅड स्क्रीप्टराईटर' हे जरी खरं असलं, तरी त्याच्या लिखाणाचा ड्राफ्ट आपल्याहाती देऊन तो आपल्या आयुष्याची एक उत्तम संहिता लिहिण्याची संधी आपल्याला देतो, याचा अर्थ तो एक उत्तम डिरेक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही! आणि 'आपण आपल्या आयुष्याची संहिता स्वतःच का लिहू शकत नाही?' याचं उत्तरही वरच्या ओळीतच दडलंय... कारण आपल्या संहितेतली बरीचशी पात्र त्याने निवडलेली असतात, रेखाटली असतात. ती समजून घ्यायला वेळ लागतोच... आणि लिहायला आयुष्यं!
---------------------हर्षल (१९/१०/२०१३ - दु. १.४५)