१०.८.१३

पर्याय

---------------"प्रेम वगैरे म्हणजे नुसतं थोतांड असतं रे... थोडे दिवस गोड गोड बोलायचं, मग हातात हात घालून गावभर हिंडायचं. मग एकमेकांसोबत पाहिजे ती थेरं करायची; ती सुद्धा जगापासून लपून छपून. त्यातून निभावलं नाही म्हणजे एकमेकांबद्दल किळस वाटून मग तोंड काळं करायचं; आणि निभावलं तर आदर वाटून लग्न करायचं... सालं, तोंड काळं केलं; तरी पुन्हा एकदा त्यातूनच जायचा मोह कुणालाच आवरत नाही आणि... आणि जर का लग्न झालं..."
असं म्हणून रोशनने ज्या तुसडेपणाने ग्लास तोंडाला लावला; तो सगळा संपल्यावरच काढला. प्रत्येक पार्टीमध्ये; ह्या विषयावर येऊन रोशनची गाडी थांबायची. किंबहूना सुटायची. त्याचा लग्न या विषयावरचा राग मग बाहेर यायला सुरू व्हायचा. लग्नापेक्षा, प्रेमविवाहावर त्याचा राग जास्त होता. खरंतर त्याचा स्वतःचाच प्रेमविवाह होता, पण लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याने त्याच्या मनात भरलेला रोष तो असा जगजाहीरपणे मांडतांना दिसायचा. समीरला त्याचं बोलणं मनावर घ्यावसं कधीच वाटलं नव्हतं, पण आज मात्र रोशनच्या बोलण्यात बरंच काही तथ्य आहे असं समीरलाच वाटायला लागलं.
---------------समीरचं रात्री उशीरा घरी येणं तन्वीला कधीच खटकलं नव्हत, जोपर्यंत समीर ऑफिसमधून सरळ, किंवा पार्टीमधून हसत-खेळत घरी यायचा. पिऊन तर्र झालेल्या मित्रांना व्यवस्थित घरी सोडून आल्यानंतर, त्यांनी केलेल्या चित्र-विचित्र गोष्टींना रंगवून; तिला अगदी पोट दुखेपर्यंत हसवायचा. मग तिचं जेवण होईपर्यंत तिच्यासोबत बसायचा. त्या दोघांचा प्रेमविवाह असुनही रोशनच्या म्हणण्याप्रमाणे ते दु:खी-कष्टी नव्हते. पण सारखं सुखसुद्धा माणसाला बोचतं म्हणतात, तसं काहीसं त्यांच्यात घडावं असं... नियतीला वगैरे नाही, त्यांच्यातल्याच एकाला वाटत होतं. म्हणजे, तन्वीला तसं काही वाटत असावं असं समीरला उगाच वाटायचं, पण त्याहीपेक्षा ते आपल्याला जास्त प्रकर्षाने वाटतंय हे तोच मनोमन कबूल करत असायचा. पण त्यामुळे आपण आपलं सुख हरवून बसतोय, या काळजीने त्याला अताशा झोपही लागत नव्हती. रोज रात्री बेडवर पडल्यानंतर विचारांची गर्दी जमायला सुरू व्हायची.
---------------"आपण नक्की काय शोधतोय? लग्नाआधीचा मी? की आताचा मी? लग्नाआधीची तन्वी? की आताची तन्वी? आणि तसंही लग्न होऊन फक्त दोनच वर्ष झालीये, मग इतक्या लवकर आपल्याला या सर्वांचा कंटाळा यावा? छे,छे... कंटाळा कसा येईल? सगळं छान चाललंय की!!! आपल्याकडे सगळं उत्तम आहे की... घर, गाडी, चांगल्या पगाराची नोकरी, आणि तन्वी... तिच्यासारखी मुलगी आपल्या आयुष्यात यावी, म्हणून मनातल्या मनात किती चित्र रंगवली होती आपण. तिला पहिल्यांदा पाहिलं ते बेंगलोरच्या एका चित्रप्रदर्शनात. तिथे तिच्या मैत्रीणीसोबत आलेली असतांना, एकेका चित्रासमोर कितीतरी वेळ उभी राहून, कसलासा विचार करून मगच पुढच्या चित्राला भेट देणारी ती... आपण तिथे एकटेच फिरत असतांना, सहज तिच्या बाजूला जाऊन उभे राहिलो काय, त्यावेळी ती पाहत असलेल्या चित्रातला एक विचित्र आकाराचा तांब्या (?) पाहून आपण हसलो काय, आणि त्यावेळी, 'मूर्ख' असं म्हणून तिने चिडून आपल्याकडे पाहिलं काय... बस्स... नंतर तिची ओळख काढून, तिच्या ऑफिसच्या वेळा साधून, ती येण्या-जाण्याच्या रस्त्यांत... असं बरंच काही करून आपण तिला पटवली. सुरूवातीला अवघड वाटणारी गोष्ट नंतर अगदी सोपी वाटायला लागली. आपल्यालाही हे जमतं असं वाटून एकदम कॉन्फिडन्स ऑन लेव्हल नाईन... पण तरीही तिच्या सोबत फिरतांना सुरूवातीला एक भितीयुक्त आदर वाटायचा आपल्याला तिच्याबद्दल... त्यामुळे तिचा हात हातात घ्यावा की न घ्यावा, गर्दीत चालतांना कुणी मुद्दाम तिला धक्का मारू नये म्हणून तिच्या खांद्याभोवती आपण हात टाकावा असं वाटत असुनही आपण घाबरायचो. घाबरायचो, म्हणजे स्वतःलाच. का कोण जाणे, पण ते सर्व वाटत असतांना आपली होणारी अवस्था आपल्याला जाम आवडायची. हातांची थरथर काय, हृदयाची जोरात धडधड काय आणि अचानक तिच्याशी नजरानजर होताच गडबडून दुसरीकडे पाहतांना, तिच्या मात्र आपल्याकडेच काही क्षण रोखून पाहणार्‍या डोळ्यांची भितीही वाटायची, स्वतःबद्दल शरम आणि पुन्हा ती आपलीच आहे हा विश्वास वाटून तिच्याबद्दल वाटणारी ओढ... तूफान!!! मग आपण बाईकवरून बेंगलोर बाहेरगावच्या रस्त्यांवरून फिरता फिरता एक दिवस हिंमत करून तिचा हात आपल्या हातात घेतला, त्यावेळचा तिचा तो स्पर्श... त्यारात्री आपण झोपेत हसत होतो असं रूममेटनं सांगितलं, तेव्हाही आपण हलकेच हसलो. शप्पथ!!! दॅट वॉज लाईक अ क्लोजेस्ट मोमेंट विथ हॅपिनेस अँड आय लिव्हड् इट विथ अट्मोस्ट प्लेजर... पुढच्या वेळी, त्याच्या पुढच्या वेळी आणि त्याच्या पुढच्याही... आणि त्या संध्याकाळी, लालबाग गार्डनमध्ये तिला केलेला, आयुष्यातला फर्स्ट किस... सगळं जग गुंडाळून बाजूला ठेवून, फक्त दोघांच्या भोवतीच सारं आकाश आणि जमीन पांघरून कितीतरी वेळ आपण हरवून गेलो होतो. खूप काही अचिव्ह केलंय असं वाटायला लागलं..."
---------------तन्वी झोपलीये का हे पाहण्यासाठी तो अलगद दुसर्‍या कुशीवर वळला. बेडलँप ऑन करून त्याने तिच्या हनुवटीवर तर्जनी ठेवली. तो तिचा चेहेरा स्वतःकडे वळवणार, तेवढ्यात तन्वीच त्याच्याकडे वळली. झटकन त्याने हात मागे खेचला. तन्वी जागी आहे असं वाटून त्याने तिच्या केसांत हात फिरवला. मग तिने कुठलीही हालचाल केली नाही. समीरला मात्र अजुनही झोप येत नव्हती. उठून किचनमध्ये जाऊन तो पाणी प्यायला. रात्रीचे दोनच वाजले होते. उद्या शनिवार, त्यामुळे दोन दिवस मनाच्या या अवस्थेत कसे काढायचे ह्या विचारांनी तो अस्वस्थ होता. मग बाहेर बाल्कनीतल्या आरामखुर्चीवर जाऊन तो टेकला.
---------------"ह्या सगळ्यांत तन्वीला आपण का त्रास देतोय? म्हणजे, आपल्या मनात असलेल्या गोंधळाला ती कुठल्याप्रकारे जबाबदार आहे? मग आपण ही अशी सायलेंट ट्रीटमेंट तिला का द्यावी? पण हा आपल्या स्वभावाचा भाग आहे, हे तिलाही ठाऊक आहेच की. कुठल्याही परिस्थितीत आपण आपल्याला काय वाटतंय, नक्की कशाचा गोंधळ चाललाय, आणि आपण त्याच्याशी कशाप्रकारे लढतोय आणि त्यातून आपण कसे बाहेर पडणार आहोत ह्याचा अंदाज कुणालाच येऊ नये यासाठी आपण अक्षरशः कोशात जाऊन बसतो. बाहेरचं जग जोपर्यंत आपल्या शांततेला सरावत नाही, तोपर्यंत आपण त्यात राहून आपल्या आत काय चाललंय याचा अंदाज घेतो, मग बाहेर काय होतंय आणि ते कसं बदलवायचं याचा खल करतो, आणि मग पुन्हा पहिल्यासारखेच ताकदीने बाहेर येऊन बेसावध झालेल्या जगाला आश्चर्याचे धक्के देत, आपल्या मनात गोंधळ निर्माण करणार्‍या गोष्टीबद्दल जगाच्याच मनात संभ्रम निर्माण करतो. आणि मग 'कसले फुसके सापळे रचतात मला अडकवायला?' म्हणून स्वतःवरच खूश होतो. इथे मात्र माझा संघर्ष माझ्याशीच आहे, आणि त्यात तन्वी सापडलीये, म्हणून तर मी गोंधळलोय. तसं ती आहे म्हणून मी आज इथे या वेळेला स्वतःची अशी ओळख निर्माण करून आहे. कारण त्या संध्याकाळी तन्वीने आपल्याला झिडकारलं नसतं तर... पार्‍याला वाहून जायची परवानगी दिली असती तर... कदाचीत ती वेळ आपल्यामुळे आली म्हणून आपण आपल्या आजच्या परीस्थितीचं श्रेय स्वतःलाही देऊ इच्छितो. किंवा ते आपल्यामुळेच झालं असंच आपल्याला वाटतंय, हो ना? हो! नाही! असं कसं? तिने त्यादिवशी आपल्याला नकार दिला आणि; 'आपण आतापर्यंत करत होतोच की हे? मग आता का नाही म्हणतेस?' म्हणून तिला बळजबरी ओढण्याचा केलेला प्रयत्न आणि तिच्या डोळ्यांत आलेले अश्रू... खोटेच वाटलेले ना आपल्याला? त्यावेळी तिने म्हटलेले ते शब्दः
"तू फक्त एवढंच करण्यासाठी माझ्याजवळ येत असशील, तर मग मला हे नकोय... आणि जोपर्यंत तुला मी काय म्हणतेय याचं गांभीर्य नाही, तोपर्यंत आपण न भेटणंच बरं... "
शॅ:... एका क्षणात सगळ्या रंगाचा बेरंग झाला होता. सगळी झिंग मातीत मिळवली होती तिनं. मी असं कधी म्हणालो होतो की मला फक्त तेच हवंय आणि तरीही तिने आपल्यावर असा संशय घ्यावा. डोकं तडकलं. मग मी ही म्हणालो,
"मला कुठलंही एक्स्प्लेनेशन द्यायचं नाहीये, पण आता तू जे काही म्हणतीयेस, त्याबद्दल तुच विचार कर आणि सांग की आपण पुन्हा कधी भेटायचं ते."
मला अजुनही खूप काही बोलायचं होतं, पण त्यावेळी ना मी बोलण्याच्या मन:स्थितीत होतो, ना ती ऐकण्याच्या... आम्ही आमच्या वाटा वेगळ्या करायला एकमेकांना संमती दिली होती. किंवा मीच ती मानली होती.
"
---------------आयुष्य एकाच वेळी किती वेगवेगळ्या ट्रॅकवरून धावत असतं हे समीरला तेव्हा कळालं. कारण तन्वी आयुष्यात आल्यापासून त्याचा अ‍ॅटीट्यूड बदलला होता. ऑफिसमधल्या प्रत्येक कामात समीर अ‍ॅक्टीव्हली सहभागी होऊ लागला होता. त्याचा प्रोजेक्ट्सुद्धा हायली प्रॉफिट देणार्‍या प्रोजेक्टमध्ये आला होता. त्यामुळे विदेशात जाण्याची संधी चालून आली. त्याच्या घरात सुद्धा त्याच्या वागण्यातला आत्मविश्वास पाहून सगळे त्याच्यावर खूश होते. बाबांनी त्याला एक्-दोनदा लग्नाबद्दल विचारूनही पाहिलं. पण त्यावेळी त्याने तन्वीचं नाव सुद्धा घरात सांगितलं नव्हतं. तो सर्वच फ्रंटवर अगदी समाधानी होता, पण लग्न वगैरे... कानाला खडा! त्याला वाटायचं, अभी तो शुरुवात है... अजून खूप काही अचिव्ह करायचंय. आपल्याला हव्या असणार्‍या, आपल्या आई-बाबांसाठी करायच्या खूप गोष्टी अजून बाकी आहेत, मग एवढ्यात लग्नाची घाई वगैरे कशाला? आणि तन्वीसुद्धा थांबायला तयार आहेच की असं वाटून तो निवांत होता. पण मग त्या प्रसंगांनंतर त्याने, तन्वीबद्दल विचारच करायचं बंद केलं. पुढच्या महिन्यात नेदरलँड्सला गेला. तिथून दीड वर्षांनं परत आल्यावर, कंपनीच्या दिल्ली ऑफिसला त्याला जॉईन व्हावं लागलं. परत आल्यानंतर मात्र, एकटं एकटं वाटायला लागलं. दिल्लीमध्ये एकट्यांनं लाईफ काढणं त्याच्या जीवावर येऊ लागलं. हळुहळू ऑफिसमधल्या कलीग्ससोबत त्याची मैत्री जमली. आणि त्यातूनच तो, रोशन, हरदीप, प्रीती, शरद आणि सायरा यांचा ग्रूप फॉर्म झाला. समीर रुळला. आणि पुन्हा तेच...
---------------तीन वाजले तेव्हा, समीर आत आला. फ्रीजमधलं कोक घेऊन त्याने ग्लासात ओतलं. सोफ्यावर बसून त्याने कोक प्यायला सुरूवात केली. इथे मात्र त्याच्या डोक्यातले विचार, मध्येच खटकन् आवाज करून चालू-बंद होणार्‍या फ्रिजमुळे चालू-बंद होत होते. त्याने मग सोफ्यावर मान टाकली. थोड्या वेळाने कोकचा संपलेला ग्लास ठेवायला पुन्हा किचनमध्ये गेला, आणि मग झोपावं म्हणून बेडरूमकडे वळला. तन्वी शांत झोपली होती.
---------------"आपल्याकडे तेव्हा पर्याय होता. पण आपण त्यावेळी दिल्लीहून मुंबईत ट्रान्सफर घेऊन आलो. आल्यानंतर, तन्वीला बेंगलोरला जाऊन भेटलो. तेव्हा तिच्या मनात कुठलंही किल्मिष न ठेवता, ती आपल्याशी त्याच सहजतेनं वागली. दोन वर्ष आपण तिला संपर्कही केला नाही, तरीही तिने त्याबद्दल आपल्याला एका शब्दानेही विचारलं नाही. मग आपणच तिला लग्नाबद्दल विचारलं ते ती 'हो'च म्हणेल याची खात्री होती म्हणून की, ती नाही म्हटली तरी 'सायरा' होतीच म्हणून? आपण तन्वीला विचारून चूक केली का?"
---------------"सायराबरोबर दिल्लीतही आपण त्याच अनुभवातून गेलो होतो. फक्त यावेळी ती थरथर, धडधड आणि भितीयुक्त आदर कुठेच नव्हता. याला कारण मात्र सायराचं लाईफस्टाईल...
"शादी-वादी अभी नहीं यार... अभी तो जीने के दिन है| यहाँ खुदको नहीं सँभाल सकते हम, तो घर-पती-बच्चे-साँस-ससूर-ब्ला-ब्ला कौन सँभालेगा..."
आपल्यालाही हे पटलेलं. त्यामुळे सायरा आपल्यासाठी एकदम योग्य पार्टनर आहे असाच आपला समज झाला. पण लग्नाबद्दल मात्र तिनेच विचारायला हवं, म्हणून आपण तिला विचारलं नाही. नंतरचे दिवस मजेत जात राहिले खरे, पण तिने आपल्याला लग्नाबद्दल विचारलंच नाही. मग बाबांच्या तब्येतीमुळे आपण इकडे यायचा निर्णय घेतला, तरीही सायराने तितक्याच निर्विकार मनाने आपल्याला निरोप दिला.
"
---------------"आणि आज तन्वीशी लग्न करून आपण आनंदात जगत असतांना, अचानक सायराने मुंबईत येऊन आपल्याला लग्नाबद्दल विचारलं, त्यामुळेच हा सगळा गोंधळ माजलाय. तिला आपण लग्न झाल्याचं कळवायला हवं होतं तेव्हाच. शिवाय तन्वीलाही सायराबद्दल आधीच सगळं सांगायला हवं होतं. त्यादिवशी रोशनसोबत ती पार्टीत आली आणि त्याच्यासमोरच तिने आपल्याला 'लग्न करशील का?' म्हणुनही विचारलं. क्षणभर सुखावल्यासारखं वाटलं, पण पुढच्याच क्षणाला, 'हिला माझं लग्न झालंय' हे तरी कसं सांगावं हा प्रश्न पडलाच. रोशन सोबत होता म्हणून वाचलो... त्याने तिला, 'अगं त्याला विचार करायला तरी वेळ दे...' असं म्हणून दूर नेलं. त्याचवेळी तिला सांगून मोकळं झालो असतो तर... पण आता आपल्यासमोर कुठले पर्याय आहेत? तन्वीला सायराबद्दल सारं सांगितलं तर ती काय म्हणेल? आणि सायराला सांगितल्यानंतरची तिची झालेली अवस्था? आणि पार्टीत रोशन जे बोलला, ते आपल्याच बाबतीत आहे की काय? तन्वीचं आपल्यावर प्रेम आहे, त्याबद्दल आपल्याला तिळमात्र शंका नाही. पण आज या क्षणाला तिच्याशिवाय दुसरं कुणी नकोय, हे स्वतःला सुद्धा पटवून द्यावं लागतंय म्हणजे आपण... व्हॉट्स राँग विथ मी?"
---------------चार वाजता समीरला झोप लागली. डोक्यातल्या सगळ्या विचारांनी हळुहळू शांत व्हायला सुरूवात केली. आज रात्रीच्या पार्टीतून समीर उशीरा घरी आला होता. आल्यानंतर त्याने तन्वीला ती जेवलीये की नाही हे न विचारताच बेडरूममध्ये येऊन पडला होता. गेल्या आठवड्यापासून तो अगदी गप्प-गप्प होता. आणि तन्वी हे सारं काही पाहत होती. एकदा तिने विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने फक्त हलकसं हसून तिला जवळ घेतलं होतं. काही बोलला मात्र नव्हता. त्यामुळे तन्वी शांतपणे घरात वावरत होती. पण ती पर्याय शोधत नव्हती, ती उत्तर शोधत होती.
---------------सकाळी दहा वाजता समीरचे डोळे उघडले. तन्वी घर आवरत होती. समीर मात्र तिच्यासमोर कसे जायचे असा विचार करून बेडमध्येच पडून राहिला. थोड्या वेळाने तन्वीच तिथे आली. तिने समीरला हाक मारून उठवलं आणि म्हणाली: "मी फूड बझारमध्ये जाऊन येते समीर. तोपर्यंत तू उठून तयार हो. आपण आज आई-बाबांना भेटायला जाणार आहोत." जातांना तिने, बेडलँपच्या खाली एक चिठ्ठी सरकवली. ती गेल्यानंतर समीरने ती उचलली आणि वाचली.
---------------"आयुष्य पर्याय निवडत जगायचं नसतं समीर. मुळात पर्याय ठेवणं हा सगळ्यांत मोठा मूर्खपणा असतो. तू तुझं आयुष्य निर्णयांवर ठरवावंस, कारण निर्णय एकच असतो. पर्याय फसवे असतात, कधी दोन पर्याय एकसारखेसुद्धा असू शकतात. पण प्रेम हा निर्णय असतो,आणि प्रेमाला पर्यायही नसतो. त्याच्यासारखं दुसरं काहीच नसतं. मला काय वाटतं हे तुला चांगलंच माहीती आहे, पण तुला काय वाटू शकतं आणि त्यावर काय निर्णय घ्यायचा याबद्दल जो तुझा गोंधळ उडालाय, त्याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न. जो काही निर्णय घ्यायचाय त्याचा सोक्षमोक्ष आताच करून मोकळा हो, आणि यातून बाहेर पड.
तुझीच तन्वी.
"
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 हर्षल (२६/५/२०१२-सायं. ६.००)