१९.९.१४

तुझे देणे...

तुझ्यासारखे सहज देणे जमले असते तर,
दाता होणे आवडले असते,
तुझ्यासारखे हसून घेणे जमले असते तर,
याचक होणे आवडले असते...
देण्या-घेण्यामधली भावना; इतरांचे सुख पाहणे,
कळले असते तर,
तुझ्यासारखे सुखी राहणे जमले असते...
देता आलं नाही, घेता आलं नाही,
हिशोब ठेवत गेलो केवळ,
जगता आलं नाही...

पण त्या हिशोबांच्या चोपडीमध्ये, तू प्रेमानं दिलेलं मोरपीस तेवढं
सुख म्हणून जपून ठेवलंय,
त्या एका देण्यातून कधी मुक्त होता आलं नाही...
- हर्षल (१३/०२/१४ - रा. ११.२०)

२६.७.१४

निरोप

निरोप देणे, निरोप घेणे अवघड जागचे दुखणे आहे...

काही निरोप, "पुन्हा लवकरच भेटू", म्हणून हसत दिले जातात!
तर काही निरोप, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी, अश्रूंसोबत द्यावे लागतात...

खरा प्रश्न तर पुढे आहे,
जेव्हा पुन्हा कधी भेटू याची, आणि भेटलो तरी; आज जसे आहोत
तसेच राहील, याची शाश्वती नसेल...
ओळख काही क्षणांची असेल किंवा नातं अगदी जुनं असेल,
पण निरोप हसून द्यावा की अश्रू रोखून द्यावा?

ह्या प्रश्नांना निरोप देणे जमेल तेव्हा जमेल,
तुर्तास केवळ आहे हे असं आहे, मानून चालावे...
निरोप देणे, निरोप घेणे जीवनाचे अटळ मागणे आहे...

-Harshal (26/07/14 - 12.45 PM)

२४.२.१४

काही क्षण असायचे...

काही क्षण असायचे,
माझे मोजके बोलायचे,
मग यायची नि:शब्दता,
अन् स्वतःला सावरायचे...

आतल्या आत झुरणारे,
क्षण सर सर सरणारे,
श्वास खोल खोल जाणारे,
पाय जड जड होणारे...

भोवती जगरहाटी तशीच,
अव्याहत चालणारी,
आणि आतली खळबळ तिथेच,
भोवर्‍यासारखी घुमणारी...

तुझ्या साथीने कधी सुसह्य झालेली,
तुझ्या सोबतही अगदी असह्य वाटलेली,
ही वाट मला आजही खूप भावलेली,
जिथे आशेची ज्योत अजुनही तेवलेली...

आता विसर होतो आहे,
गोंधळल्या त्या क्षणांचा,
तुझ्या मुक्या ओठांवरच्या,
काही अबोल पणांचा...

जिथे मंदावली वाट,
तिथे घट्ट झाले हात,
शब्द मोकळे जाहले,
आले नेटक्या ओघात...

बाकी सारे लख्ख होते,
दोन क्षण स्तब्ध होते,
त्या क्षणांनी बदलले,
माझे प्रारब्ध होते...

आता ह्याच आठवणी,
तुझ्या माझ्या एक मनी,
आली सांज मोहरूनी,
भर प्रेमाची करूनी...

असे काय तेव्हा होते,
ज्याने रोखलेले होते,
तुला आधीच मिळाले,
मला कळले न होते?

पण तेव्हा काही क्षण असायचे,
तुझे मोजके हसायचे,
मग यायची प्रसन्नता,
सारे हलके हलके व्हावयाचे...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हर्षल (१०/१२/११-दु. ४.१५)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

१५.२.१४

मैत्रीमधले यात्री आपण...

आपण दोघे प्रवासातले, थोडे थोडे अंतर,
चालत जाता उगाच वाटे, झाले जंतर मंतर...
संपून जाते वाटच आणि संपत नाहीत गप्पा,
मैत्रीमधला जपलेला हा आयुष्याचा कप्पा...

उमटत जाते हृदयामध्ये प्रेमाची लकेर,
थोपवण्याचा हट्ट नाचतो मनात मांडून फेर,
हातामधल्या हातांना मग स्पर्शांचे उलगडणे,
अर्थांना, नात्यांना देता नावे; का अवघडणे?

क्षणिक मोहही चुकवून ठोका हॄदयाचा जातो,
वादळात सावरणारा मग हात मैत्रीचा होतो...
प्रेमाचे पण नाते होते, नात्यांचा होतो गुंता,
मैत्रीला पण भासत नाही, कधीच असली चिंता...

आपण दोघे मैत्रीमधले यात्री आनंदाचे,
सोबत चालत जाणे, जगणे अनंत क्षण सुखाचे...
कधी न संपो वाट आपली, थांबाव्या ना गप्पा,
मैत्रीमधला जपलेला हा आयुष्याचा कप्पा...
-हर्षल (१५/०२/१४ - दु. २.१५)

२२.१.१४

माझं फेसबूक पेज...

मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

सहज कधी आठवण येते त्या मित्रांची जे आता या जगात नाहीत,
पण तरीही त्यांना फ्रेंडलिस्टमधून उडवता येत नाही,
"मला विसरलास यार तू" म्हणून, जणू रागे भरतील, असतील तिथे...
त्यांच्या पेजवर स्पष्टपणे दिसते त्यांच्या असण्या-नसण्यातली रेषा,
त्यांची शेवटची पोस्ट आणि त्यावरती जगाने घातलेला RIP :'( च्या पोस्टचा रतीब...
ते गेल्यानंतरही, केवळ फेसबूक सांगतं या दिवशी ते जन्मले होते,
म्हणून हॅपी बर्थडे विशेस...
आणि क्षणभर वाटतं, काय खरं समजावं?
या शुभेच्छा की तो मित्र गेल्याचं दु:ख?
कालांतराने ते ही आठवणीतून निघून गेलेलं...
त्याला स्वतःला कधी तरी येऊन ते पेज पाहता येईल का?
आणि एखाद्या तरी पोस्टला उत्तर देता येईल का?

जगतांना; प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्यासाठी असलेल्या फेसबूकच्या भिंतीवर,
मेल्यानंतर, एकदाच... फक्त एकदाच, येऊन सारं साफ करून,
कुणाला तरी सांगायचे राहिलेले दोन प्रेमाचे शब्द लिहून जाता येणार असेल तर...

तसं होणार नाही म्हणून,
मी मरेन तेव्हा, माझं फेसबूक पेज मला डिअ‍ॅक्टीवेटेड हवं...

- हर्षल (२२/०१/२०१४ - रा. ११.००)