१६.२.१५

एक संध्याकाळ...

................उन्हाळा सुरू झाल्याची मला चाहूल लागते ती अशी. एखाद्या संध्याकाळी, खूप कामं करायची असतांनादेखील अजिबात उत्साह जाणवत नाही. मन अगदीच रिकामं असतं. म्हणजे काहीतरी हरवलंय असं अचानक वाटायला लागतं, पण काय ते नेमकं शब्दांत सुचत नाही. गेल्या काही दिवसांतल्या सर्व घटनांचा मनात आढावा चाललेला असतो, तरीही त्यातून नेमकं काय हवंय ते कळत नाही. नुसताच वेळ घालवायचा असतो, पण तो जाता जात नाही.

................कुणीतरी सोबत असावं असं वाटत असतं, पण ती व्यक्ती जवळ असत नाही. अचानक कोसो दूर गेल्यासारखी भासते. फोन उचलावा, नंबर शोधावा, पण डायल करावासा वाटत नाही. म्हणजे त्या फोनकडे बघतांना, त्यालाच आठवण येऊन त्याने फोन केला तर... असं म्हणत फोनकडे नुसतं पहात रहायचं. बाहेर उगाच चालायला जावं, पण कुठे ते कळत नाही. वारा सुटत नाही, आणि फार गरमही होत नाही.

................आपण हे सगळं का करतोय, हा प्रश्न स्वत:ला दहावेळा विचारला, तरी कुणीच उत्तर देत नाही. एखाद्या नदीच्या किनारी जाऊन, केवळ शांत बसावं. तिथे अवखळ प्रवाहाचा आवाज आपल्या मनातल्या खळबळीशी जुळावा. अचानक एखादी थंड वार्‍याची झु़ळूक यावी, आणि मारव्याचा 'त्या' कोमल ऋषभाची कुणीतरी आपल्याला कातरतेने साद घालावी असं वाटत असतं. पण तसं काहीच होत नाही. एकटेपण जात नाही. मग परत फिरून घराकडे निघावं. वाटेतल्या येणार्‍या जाणार्‍या गर्दीला न्याहाळावं. आणि पुन्हा असं काही झालं तर काय करायचं याचा विचार करत घरी येतो. पण तरीही उत्तर असं मिळत नाही... दरवर्षी मला उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागते ती अशी...
- हर्षल (१६/०२/१५ - रा. १०. ०० )