८.५.१५

"नाटक परीचय : 'अ'फेअर डील"

....................आजच्या वीस - बावीस वर्षांच्या तरुणांना प्रेम म्हणजे काही भव्यदिव्य वाटत नसतं. या वयात येईपर्यंत, बर्‍याच होतकरू आणि प्रायोगिक प्रेमप्रकरणांचे ते प्रमुख सल्लागार बनलेले असतात. अशीच एक तरूणी, जी कायम प्रेमात पडत असते, आणि तिचे उठसूट ब्रेकअपही होत असतात, ती या नाटकाची प्रोटॅगोनिस्ट आहे. नाही, हे नाटक तिच्या अफेअर्स विषयी जरी सारखं सारखं भाष्य करून तरुणांना प्रेमाबद्दल डोस पाजत असलं, तरी एक्झॅक्ट्ली त्याबद्दल नाहीये. ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून एक नाटकातलं नाटक लिहितीये, त्यातल्या चाळीशी पार केलेल्या जोडप्याच्या एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरबद्दल आहे. लेखक/दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे, यांचं हे नवीन नाटक, ज्यात आनंद इंगळे, मंजुषा गोडसे आणि मृण्मयी देशपांडे, सौरभ गोगटे आणि नचिकेत देवस्थळी यांच्या भुमिका आहेत.
....................या नाटकाची सुरुवात होते निकिता (मृण्मयी)च्या अफेअरने. तिने नाटक लिहिण्याचा घाट का घातलाय, ती कशी अवखळ कॉलेज तरुणी आहे वगैरे वगैरे मृण्मयीने छान बेअरींग घेतलंय. तिच्या नाटकातले चाळीशी ओलांडलेले जोडपे म्हणजे मंदार (आनंद) आणि देवयानी (मंजुषा). आपला नवरा सतत पैसा कमवण्याच्या नादात आपल्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणुन एक गुरू नावाच्या माणसाशी देवयानीचं लग्नबाह्य अफेअर सुरू असतं. हे अफेअर त्या जोडप्याला असणार्‍या मुलीला कळतं, आणि ती आपल्या बाबाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणुन प्रयत्न करते. दुसरीकडे तिच्या बाबाचं त्या अफेअरला काहीच हरकत नसणं, तो तिसरा व्यक्ती सर्रास घरात बाबासमोर येणं, आई-बाबांचं एकमेकांशी असलेलं अगदी मोकळीकीचं वागणं, आणि या सर्वांमुळे चक्रावून गेलेल्या त्या मुलीच्या वयानुसार गोंधळून जाणं, आणि मग ह्या सगळ्याची कारणमीमांसा करून शेवटाकडे सगळं छान, सुरळीत होणं हे सगळं या नाटकात आलंच. पण विषयाचा अवाका मात्र, प्रेम आणि पैसा, यांच्यातल्या 'महत्त्वा'बाबतचं द्वंद्व, तरुणांचं प्रेम आणि लग्न, लग्नबाह्य संबंधांची गरज का पडू शकते, आणि तरूणांनी प्रेम करावं म्हणजे नक्की कसं करावं, करावं की करू नये, असा आहे. यात अफेअर असं खूप काही नाहीये, याचा उलगडा उत्तरार्धात होतो.
....................नाटक म्हटलं की, अनपेक्षित गोष्टींनी रंगमंचावर अवतरणं अपेक्षित असतं. या नाटकांतल्या घटना अतर्क्य आहेत, पण अशक्य नाहीत. त्या खरंच घडू शकतात. वयात आलेल्या मुलांना आपल्या पालकांपेक्षा आपल्या मित्रांवर जास्त भरवसा असतो. डोक्यात संशयांचे काहूर माजले, की त्यांची बुद्धी नको तितकी वेगवान धावू शकते. ती धावली की त्यांना समजणारही नाही, परंतू त्यांचे नुकसान करेल अशा गोष्टी घडत जातात. सुखवस्तू घरातली ही मुलगी आपल्या आईची डायरी वाचून, त्यात लिहिलेल्या गोष्टींवरून आपल्या आईचं कुणाशी तरी अफेअर आहे, मग तो माणूस कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. आपल्या बाबाला प्रत्यक्षपणे सांगता येत नाही म्हणून अज्ञात बनून कळवते. नाटकातला बाबा हा सगळं माहीत असुनही, सगळं निमूटपणे पाहणारा, उलट आपल्या बायकोच्या अफेअरबद्दल कळवणार्‍या व्यक्तीलाच ठणकावून सांगणारा, आणि कुठलाही संशय न घेणारा दाखवलाय. यात त्याचा काय फायदा, किंवा त्याचं स्वतःचही कुठे बाहेर अफेअर असल्याचा संशय निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो. नाटकातली आई, ही खरंच इतकी उथळ स्वभावाची स्त्री आहे का? ती नाहीचे, पण तरीही एका परपुरूषाबरोबर ती अगदी सहज कशी काय वागते/मोकळी होते? तिला बाबाने दिलेल्या मोकळीकीचा ती गैरफायदा घेतेय आणि तरीही ती इतकी सहज कशी घरात वावरते? हे सगळं नाटकात होतं
....................या नाटकाचा गाभा म्हणता येईल, ते म्हणजे लग्नानंतर बदलत जाणार्‍या आयुष्यावरचं भाष्य. पुरूष लग्न झाल्यानंतर पैसा कमवणे ह्या मुख्य जबाबदारीसाठी हळुहळू कमी प्रेमळ, कमी भावनाशील होऊन जास्त प्रॅक्टीकल होऊ लागतो. स्त्रीसुद्धा मुल झालं की तिच्या विश्वातून तिची लग्नाआधीची प्रेयसी जाऊन केवळ आई उरते. वेळ जातो तसा नात्यांला म्हातारपण येऊ लागतं. आणि चाळीशीमध्ये जेव्हा सर्व सुखं उपभोगून झाली असतात, सर्व सुखसोयींची पूर्तता झालेली असते, तेव्हा स्त्रीला आपल्या पतीकडून तशाच प्रेमाची ओढ लागते. पण पुरूषाची मात्र मानसिकता पूर्ण पैशाळू झालेली असते. सर्व कळत असूनही त्याला आपल्या वर्तमानाची घडी मोडू न देता, भविष्याच्या सुरक्षिततेसाठी कायम राबावंच लागणार असतं. त्यात वाढलेल्या जबाबदार्‍यांनी तो दबलेला असतो. (यांत स्त्री ही केवळ गृहीणी आहे हेच कसं लेखकाने गृहीत धरलंय, हे नाटक स्वातंत्र्य...) त्यामुळे ती स्त्री स्वतःला रमवण्यासाठी कशाचा आधार घेऊ शकते यावर अफेअर डील घडतं. दुसरं महत्त्वाचं भाष्य म्हणजे, तरूण मुला मुलींची प्रेमप्रकरणं. ती लोणच्यासारखी मुरत तर नाहीच, पण कच्च्या कैर्‍यांना मिटक्या मारून खाऊन टाकून, कोयी फेकून देणार्‍यांसारखी असतात. मजा गेली, की नवीन. क्षणांत हे, तर क्षणांत ते. जोडीला व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबूकचा उल्लेख केला की झालं नाटक आजच्या काळातलं. प्रेम क्षणभंगूरच आहे, हे आजच्या जनरेशनने आधीच मान्य करून मोकळे झाल्यामुळे, एखादी गोष्ट हातात आली नाही तर दु:खी व्हायची काही आवश्यकता नाही. नेक्स्ट टाईम, नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी म्हणत ते रेडी होतात. पण हातात न आलेल्या गोष्टीचं जेवढं दु:ख मोठं, तेवढंच ती गोष्ट मिळाल्यानंतरचा समाधानही तितकंच मोठं, हे प्रेमाच्या बाबतीत आता किती खरं उरलंय, हे या नाटकातून समोर येतं.
....................राजन भिसे यांचं छान नेपथ्य, नरेंद्र भिडेंचं संगीत उत्तम. प्रकाशयोजनाही अपेक्षेप्रमाणेच. पूर्वार्ध उत्कंठावर्धक, तर उत्तरार्धात मात्र प्रेमाबद्दल अतिडोस होतो की काय अशी भिती वाटते. सगळी मुरलेली कलाकार मंडळी असल्यामुळे अगदी अभिनयक्षमतेची जोखणी होत नाही, कारण इथे कुठलेही धक्के बसत नाहीत. सगळं सहजतेने होतं, पण प्रेडीक्टेबल (प्रेडीक्ट करण्याची सवय झाली असल्यामुळे कदाचित...) आहे. कॉर्पोरेटमधलं पॉलिटीक्स हा एक साईडलाईन ट्रॅक आहे, पण तो खूपच अल्लड तर्‍हेने मांडलाय. (माझं वैयक्तिक मत). एकदा पहायला हरकत नाही. कारण काही काही पंच लाईन्स तंतोतंत खर्‍या आहेत.

तळटीप : बालगंधर्व रंगमंदीर एसी असलं, तरी डास खूप चावले. तेवढं 'नॉट फेअर'...

- हर्षल (८/५/१५ - पहाटे २.५०)

१४.४.१५

कॉफी आणि बरंच काही...

...................प्रेम करूनही व्यक्त न होता येणं, आणि त्यामुळे कित्येक अधुर्‍या कहाण्या सुफळ संपूर्ण न होणं, हे आज कालच्या फास्ट फॉर्वर्ड जमान्यात शक्य तरी आहे का, असा प्रश्न मनात येणार्‍या लोकांसाठी कॉफी... हा चित्रपट नाही. चित्रपट त्या लोकांसाठी आहे, ज्यांना जगासमोर इतर कोणत्याही गोष्टीवर खूप बोलता येतं, व्यक्त होता येतं; पण प्रेम हा विषय आला, की मग मात्र दातखिळी बसते. आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांंमध्ये फिट बसतो का? आपल्यामध्ये समोरच्या व्यक्तीला किती इंटरेस्ट आहे? आपण आपलं प्रेम व्यक्त केल्यानंतर आपल्याला होकार मिळेल का? आणि नकार मिळाला तर आपण तो सहन करू शकू का? या प्रश्नांनी नाही म्हटलं तरी पुढे जाण्याचं धाडस मुलांमध्ये यायला, अजून किती अवकाश जायचाय देव जाणे. आणि मला तो आवडत असला, तरी प्रपोज त्यानेच करायला हवं. त्याला मी आवडते हे त्याने सार्‍या जगासमोर किमान हळू आवाजात तरी बोलायलाच हवं ह्या कल्पनांपासून मुली कधी दूर जाणारेत हे ही देवच जाणे... परंतू या सगळ्यांत आपल्याला आवडणारी व्यक्ती नकळत हरवून जाते, प्रेम व्यक्त न केल्याने आपण आयुष्यातली एक महत्वाची स्टोरी खरोखर अर्धवट सोडून देतो. कारणं काहीही असोत, परिणाम मात्र वाईटच. कॉफी... या सगळ्यांवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणून किमान एक तरी प्रेमकहाणी पूर्ण करतो. अगदी साध्या सोप्या विषयाभोवती छोट्या छोट्या प्रसंगातून परिणाम साधत कॉफी आणि बरंच काही हॅपी एंडिंगला येतो.
...................चित्रपट कुणाचा, कोण कोण लीड अ‍ॅक्टर्स, अ‍ॅक्ट्रेस, सपोर्टिंग कास्ट आहे हे ऑलरेडी चित्रपट प्रदर्शित होऊन आठवड्याहून आधिक काळ होऊन गेल्यामुळे लिहित बसत नाही. इथे मुलगा आणि मुलगी दोघंही एकमेकांना पसंत करूनही केवळ संवाद न साधण्यामुळे, ऐन वेळी मनात आलेल्या भावनांना योग्य त्या शब्दांत व्यक्त न केल्यामुळे, एकमेकांपासून दुरावण्यापर्यंत येतात. त्यांना समजावून सांगायला मित्र, मैत्रिणी, आई-बाबा, लहान-मोठे भाऊ बहिणी इतके सगळे समजूतदार लोक सोबत असतात. तरीही, पाऊल पुढे टाकयचं कुणी, या एका प्रश्नापुढे दोघेही हतबल होऊन केवळ होतंय त्याकडे पाहत राहतात, ही आजुबाजूलाच घडणारी गोष्ट दिग्दर्शकाने गुंफलीये.
...................आपली जनरेशन, प्रेमात पडली तर एकाच्याच पडेल अशीही आहे, आणि "आज पूजा, तो कल कोई दूजा" अशीही आहे. ती स्वपसंतीनेच लग्न करण्याच्या फेवर मध्ये आणि कांदेपोहे च्या अपोजमध्ये आहे. तसंच कांदेपोहे सुद्धा चवीने चाखून, चहा कॉफी घेता घेता, नीट सर्व बाबी तपासून, मनमोकळं बोलून मग काय हवं नको त्यावर निर्णय घेणारी सुद्धा आहे. वय वाढत जातंय म्हणून, आई-बाबांना काळजी वाटतेय म्हणून, शेजारी पाजारी नावं ठेवतात म्हणून, मित्रांची लग्न होतायेत म्हणून आणि केवळ आयुष्यात कुणीतरी सोबत हवीय म्हणून लग्नाला तयार व्हायचं हे आम्हाला पटत नाही, आणि त्याला उघड विरोध केला तरी, एका मर्यादेपलीकडे हात गुडघे टेकवण्या आणि मान टाकण्याशिवाय ऑप्शन उरत नाही. कॉफी हा सध्याचा कांदेपोह्यांना (सुशिक्षीत+अर्बन) समर्थ ऑप्शन आहे. पण तरीही, शंकांचं मोहोळ काही केल्या थांबत नाही, आणि निर्णय घेणं सोपं पण होत नाही.
...................ह्या चित्रपटात एक गोष्ट अधोरेखीत होते ती ही, की प्रेम करण्यासाठी व्यक्ती तुमच्या आजुबाजूची असते. म्हणजे, तुम्ही जिथे सोशलाईझ होत असतात, जिथे तुमच्या ओळखी होत असतात अशा ठिकाणी तुम्ही एखाद्या व्यक्तीला लाईक करतात. आणि मग तिथून पुढे गोष्टी आधी प्रोफेशनल आणि मग पर्सनल लेव्हल वर बदलत जातात. इथे कॉलेजमधलं प्रेम हा विषय नाही. लग्नाळू मुलं - मुली अशाच जागांमधून एकमेकांसाठी लाईफ पार्टनर शोधतात. त्यामुळे इमोशनल कोशंट सुद्धा आपल्या जनरेशनचा तितकाच हाय(high) हवा हे ही तितकंच महत्त्वाचं. गोष्टी सकारात्मक शेवटास जातील याचाही कुठलाच भरवसा नाही. त्यामुळे, कॉफीचा आनंद घेत घेत आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची आजकालची पद्धत जितकी सुखदायक आहे, तितकीच त्रासदायक सुद्धा होते, पण तो या चित्रपटाचा भाग नाही.
...................पार्श्वसंगीत उत्तम. व्हायोलिन्सचा मस्त, सुरेल आणि सुरेख उपयोग. तसंच, सिचुएशन ला साजेशा याद पियाकी आये... असा शास्त्रीय संगीताचा वापरही मस्त. छोट्या छोट्या शेरांची पेरणी मस्त. बॅकग्राऊंडला चालणारं एक गाणं, एक आणखी साँग आणि चित्रपटाचा योग्य जागी, योग्य ठिकाणी होणारा योग्य शेवट. इन शॉर्ट, जगण्याचा एक साधा सोपा अनुभव, नेटक्या चौकटीत मांडलेला एक मस्त चित्रपट. कॉफी आणि बरंच काही... किंवा, बरंच काही आणि कॉफी (असं नवीन बदललेलं नाव).
Harshal (14/04/2015 - 00:25 Tuesday)

१६.२.१५

एक संध्याकाळ...

................उन्हाळा सुरू झाल्याची मला चाहूल लागते ती अशी. एखाद्या संध्याकाळी, खूप कामं करायची असतांनादेखील अजिबात उत्साह जाणवत नाही. मन अगदीच रिकामं असतं. म्हणजे काहीतरी हरवलंय असं अचानक वाटायला लागतं, पण काय ते नेमकं शब्दांत सुचत नाही. गेल्या काही दिवसांतल्या सर्व घटनांचा मनात आढावा चाललेला असतो, तरीही त्यातून नेमकं काय हवंय ते कळत नाही. नुसताच वेळ घालवायचा असतो, पण तो जाता जात नाही.

................कुणीतरी सोबत असावं असं वाटत असतं, पण ती व्यक्ती जवळ असत नाही. अचानक कोसो दूर गेल्यासारखी भासते. फोन उचलावा, नंबर शोधावा, पण डायल करावासा वाटत नाही. म्हणजे त्या फोनकडे बघतांना, त्यालाच आठवण येऊन त्याने फोन केला तर... असं म्हणत फोनकडे नुसतं पहात रहायचं. बाहेर उगाच चालायला जावं, पण कुठे ते कळत नाही. वारा सुटत नाही, आणि फार गरमही होत नाही.

................आपण हे सगळं का करतोय, हा प्रश्न स्वत:ला दहावेळा विचारला, तरी कुणीच उत्तर देत नाही. एखाद्या नदीच्या किनारी जाऊन, केवळ शांत बसावं. तिथे अवखळ प्रवाहाचा आवाज आपल्या मनातल्या खळबळीशी जुळावा. अचानक एखादी थंड वार्‍याची झु़ळूक यावी, आणि मारव्याचा 'त्या' कोमल ऋषभाची कुणीतरी आपल्याला कातरतेने साद घालावी असं वाटत असतं. पण तसं काहीच होत नाही. एकटेपण जात नाही. मग परत फिरून घराकडे निघावं. वाटेतल्या येणार्‍या जाणार्‍या गर्दीला न्याहाळावं. आणि पुन्हा असं काही झालं तर काय करायचं याचा विचार करत घरी येतो. पण तरीही उत्तर असं मिळत नाही... दरवर्षी मला उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागते ती अशी...
- हर्षल (१६/०२/१५ - रा. १०. ०० )