२१.४.१३

थोडंसं मनातलं...

........................संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर, केवळ भुकेचे विचार डोक्यात घोळत राहतात. एरव्ही सुद्धा डोकं फार ताळ्यावर राहतं अशातला काही भाग नाही. पण त्या दिवशी ऑफिसमधल्या टेन्शनचा भार डोक्यावर घेऊन निघालो होतो. खूप असं नाही, पण होतं तेवढंच पुरेसं आणि नकोसं होतं.
........................येरवडा ते पुणे स्टेशनच्या पीएमटीमध्ये बसल्यानंतर, मी माझ्याच विचारांत गुंतलो होतो. आजुबाजूला फक्त गोंधळ ऐकू येत होता. मी ते सगळं ऐकून घेत होतो, त्यातही मनातले आवाज अजून डोकं बधीर करत होते. सेंट्रलला त्या बसमध्ये ती 'चौघं' बसली. अर्थात उभी राहिली; कारण 'आम्ही' जागा व्यापलेल्या होत्या. त्यांचं एकमेकांशी अगदी हसत-खेळत संभाषण चाललं होत. ते काय बोलतायेत याकडे कुणाचं किती लक्ष होतं मलाही ठाऊक नाही. कारण प्रत्येकजण माझ्यासारखाच कुठल्या न कुठल्या विचारांत, कुणाशी बोलण्यांत मग्न होता. बस ट्रॅफीकमधून वाट काढत जात होती.
........................पण तेवढ्या वेळात हळुहळू सार्‍यांचं लक्ष त्या चौघांच्या बोलण्याकडे जायला लागलं. कुणाचं कौतुकाने, कुणी थट्टेने त्यांच्याकडे पहायला लागले. ती चौघं त्यांच्याच जगात हरवलेली होती. एकमेकांशी हातवारे करुन बोलणारी ती अगदी मनमोकळेपणानं; बसमधल्या गर्दीत आपण उभे आहोत याची पर्वा न करता अगदी सहज एकमेकांशी संवाद साधत होती.
........................ माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं, ते ही लोकं नक्की का अशी हातवारे करून बोलताय; आणि संपूर्ण बसमधल्या गोंधळाचा; गर्दीचा त्यांना काहीच कसा फरक पडत नाहीए या विचारामुळे. ती बोलत होती, पण तिथे शब्द नव्हते; हसत होती पण त्या हसण्याला आवाज नव्हता. खिडकीबाहेर धो-धो पाऊस पडावा; पण आपल्याला त्याचा आवाजही येऊ नये; पडणारी प्रत्येक सर आपल्याला ये-ये म्हणुन बोलावतेय आणि तरीही जाता येऊ नये, अशा त्या पावसात चिंब भिजण्याचा आनंद ती चौघंच घेऊ शकत होती. त्यावेळी माझ्या मनात एक निर्वात पोकळी तयार झाल्यासारखी मला वाटलं. माझ्या डोक्यातले विचार तोपर्यंत कुठेतरी लांब निघून गेले होते.
........................ आणि मी फक्त त्यांच्या चेहेर्‍यावरच्या निर्मळ आनंदाकडे पाहत होतो. अगदी थोडाच वेळ; मी बसमधून उतरेपर्यंतच मला तो आनंदाचा पाऊस अनुभवता आला. पण त्यात भिजून मला अगदी मोकळं झाल्यासारखं वाटलं. शब्द बोलता येतात; ऐकू येतात; पण त्यांना आजूबाजूच्या समान लोकांसमोर व्यक्त करतांना दहा वेळा अगम्य दुनियेच्या रीती-रिवाजांचा विचार करणारे आपण. आणि एक शब्दही न बोलता हवा तो अर्थ; हवी ती भावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य असलेली ती चौघं मला माझ्यापेक्षाही कितीतरी भाग्यवान वाटली. ती एकमेकांच्या हृदयाची भाषा बोलत होती असं मला वाटलं.
........................ आणि मला मात्र माझ्या मनातल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी किती शब्द वेचावे लागतात?
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा